रविवार, २५ डिसेंबर, २०११

तुझा हात सोडून जावे कुठे?



तुझी लाट बनवून गेली किनारा तरावे कुठे मी बुडावे कुठे
हजारो दिशांनी तुझी हाक येते, तुझा हात सोडून जावे कुठे?

... असावे इथे तू असे वाटताना पहावे इथे नेमके तू मला
उखाणे तुलाही उखाणे मलाही उखाणेच ते उलगडावे कुठे?

नशीबी जरी रोज असती उपेक्षा ..अपेक्षा कधी संपल्या का कुठे
शरीरास या श्वास उच्छवास सांगे तुला सोडुनी वावरावे कुठे?

दिसेना तुला मी - मला सांगते तू- क्षितीजा पुढे काय दिसते तुला?
परीघात फिरतो तुझ्या मी कधीही तुझ्यातून मी मावळावे कुठे?

तुला पाहिल्यावर तुझ्यातच हरवतो ठरवतो सदा होत जावे असे
कळावे तुझ्या मुग्ध अधरास तेव्हा असे जिंकणे नोंदवावे कुठे?

अरे जीवना काय देतोस धमक्या मला फक्त तू एवढे सांग रे
नडावे कशाला नडावे कुणाशी नडावे किती अन् नडावे कुठे?

0 टिप्पणी(ण्या):