सोमवार, २३ जानेवारी, २०१२

मिठीत घेता धुंद अबोली ....


निळी सावळी रात नशीली
प्रहर जुना प्रीत नवेली ....
खुलवीत गेली रंग कोवळे
मिठीत घेता धुंद अबोली ....

गंध गहिरा पाकळ्यांचा
बहर नवा गोड फुलांचा
तरारले मन आज कशाने
स्पर्शात स्पर्श चांदण्याचा

देहात गोऱ्या मग मिसळे लाली
ओठी हसू जणू गुलाब गाली ....
खुलवीत गेली रंग कोवळे
मिठीत घेता धुंद अबोली ....

मंद मंद प्रवास प्रणयाचा
कहर होता यौवनाचा
आज असे हे हृदय गुंतले
कसा आवरू क्षण मोहाचा

श्याम वेडी मग राधाही भुलली
मेघ वर्णी जणू न्हाऊन गेली
खुलवीत गेली रंग कोवळे
मिठीत घेता धुंद अबोली ....


कवि : रुपेश सावंत

0 टिप्पणी(ण्या):